![]()
अमरावती येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानव जीवन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन विद्याभारतीचे निवृत्त प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांच्या हस्ते झाले. यावेळी मायाताई वाकोडे, डॉ. प्रकाश मानेकर, उद्योजक नंदकिशोर गुंबळे, ॲड. गणेश हलकारे, शेखर पाटील, डॉ. बी. डी. बेलसरे, प्राचार्य नजमा इनामदार, रवी मानव, प्रा. डॉ. गजानन वाघ, प्रा. डॉ. कीर्तिध्वज गवई आणि डॉ. अविनाश दारशींबे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अंबादास खडसे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?’ हे उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. दुसऱ्या सत्रात ॲड. गणेश हलकारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मनातील भीती, भूत, देवी-देवता अंगात येणे, मंत्र-तंत्र आणि जादूटोणा यामागील वास्तववादी कारणे सविस्तरपणे स्पष्ट केली. तिसऱ्या सत्रात मुंबईचे मनीष कुमार यांनी डिजिटल युगातील व्यक्तिमत्त्व विकास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर दृक-श्राव्य माध्यमातून सादरीकरण केले. त्यांनी डिजिटल युगातील अंधश्रद्धा आणि वाढत्या सायबर फसवणुकीवर विशेष भर दिला. तसेच, विजय कुलकर्णी यांनी तथाकथित चमत्कारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा स्पष्ट केली. शेवटच्या समारोपीय सत्रात ॲड. गणेश हलकारे यांनी आधुनिक बुवाबाजीवर प्रहार करत ‘संत कोणाला म्हणावे?’ यावर प्रकाश टाकला आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर कांचन दाहेदार यांनी सूत्रसंचालन केले. आयुषी बनसोड यांनी आभार प्रदर्शन केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सुधीर लसणकर, राजेंद्रभाऊ इसाने, महेंद्र भंडारकर, प्रकाश कळसकर, पुरुषोत्तम दाहेदार, हरीश केदार आणि राहुल सपकाळ यांनी परिश्रम घेतले.
Source link
अमरावतीत 'वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानव जीवन' कार्यशाळा:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजन