Headlines

सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रकांत पाटील:संत अच्युत महाराज गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतीकचिन्ह, संकेतस्थळाचे विमोचन




राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनुष्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असल्याचे सांगत सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अमरावतीचे भूषण असलेल्या संत अच्युत महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे प्रतीकचिन्ह आणि संकेतस्थळाचे विमोचनही करण्यात आले. हा गुरुपौर्णिमा उत्सव औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि श्री संत अच्युत महाराजांच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन करून झाली. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे क्षेत्रीय अधिकारी सुशील जाधव, श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. श्रीकांत देशमुख आणि शुभदा पोतदार यांनी हा विधी पूर्ण केला. संत अच्युत महाराजांचे कृपापात्र शिष्य संत सचिन देव महाराज यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उत्सवादरम्यान, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज वाडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या प्रतिष्ठानच्या प्रतीकचिन्हाचे आणि प्रतिष्ठानचे सचिव अभिलाष बेंडे यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठानची पहिली कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. आपल्या आशीर्वाचनात संत सचिन देव महाराज यांनी वैदर्भीय संतांचा नावलौकिक जगभर असल्याचे सांगितले. घराघरात जिव्हाळा टिकवून ठेवण्यासाठी संतांचे उपदेश आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. आजच्या तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवताना आपले अंतःकरण आध्यात्मिक ठेवावे, असेही ते म्हणाले. यापूर्वी भाजयुमो प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्य उमा गाडगीळ यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला. अंजली व यश खेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीगीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीप्ती पोतदार यांनी केले, तर ज्योती चांदुरे यांनी सूत्रसंचालन केले आणि नीता पोखर्णीकर यांनी आभार मानले. अनिरुद्ध गडकरी, अमेय वडोदकर, मुकेश पायघन, दीपक मालखेडे, अर्चना देशपांडे, रागिणी मोकासदार, माधुरी शहाणे यांनी उत्सवाचे नियोजन केले. या उत्सवात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *