![]()
इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर करून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार देत तिचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना शिर्डी हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील 22 वर्षीय तरुणीची सुमारे वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून डोणगाव (ता.वैजापूर) येथील आकाश दगूकसबे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत एप्रिल व मे 2026 या कालावधीत शिर्डी येथील एका लॉजमध्ये अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आपण गर्भवती असल्याचे समजताच आरोपीने लवकरच लग्न करू, असे सांगून तिला डोणगाव येथील आपल्याघरी ही नेले. मात्र, कुटुंबीयांची संमती नसल्याचे कारण पुढे करत तो लग्न टाळत राहिला. तो नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत होता. अखेर लग्नास स्पष्ट नकार देत त्याने तरुणीचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला. 24 जुलै रोजी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता तरुणी सुमारे तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने विरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आकाश दगू कसबे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
Source link
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर शिर्डीच्या लॉजमध्ये वारंवार अत्याचार:गर्भवती राहिल्यानंतर प्रेयसीचा नंबर ब्लॉक, विरगाव पोलिसांत गुन्हा दाखल