![]()
शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नामपूर येथील इंदिरा नगर परिसरातील मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी करूनही ग्रामपंचायतीने ठोस कार्यवाही न केल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंदिरानगर हा नामपूरमधील दाट लोकवस्तीचा परिसर असून येथील मुख्य रस्ता दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याखाली खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून दुचाकी घसरून किरकोळ अपघातही होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या. लोकप्रतिनिधींचेही लक्ष वेधण्यात आले, मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्याचे काँक्रीटीकरण करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नरेश अहिरे, सोनू पगारे, प्रदीप पोतदार, गणेश नेर, दीपक खैरनार, प्रशांत पगार आदींनी दिला आहे. मतदानावर बहिष्काराचा इशारा इंदिरानगरसह मालेगाव रोडलगत स्वामी समर्थ हाउसिंग सोसायटी, आनंद नगर, अरिहंत नगर, कस्तुरचंद नगर, मुसळे नगर आणि राजमाता जिजाऊ नगर येथेही पिण्याचे पाणी व काँक्रीट रस्त्यांची समस्या कायम आहे. या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध न झाल्यास येणाऱ्या ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Source link
नामपूरला इंदिरानगरचा रस्ता जलमय:काँक्रिटीकरणासाठी नागरिकांचा आंदोलनाचा इशारा;तक्रारींकडे दुर्लक्ष