![]()
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, मला असे वाटते की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरले आहेत. मुळात यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारात नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचे काम चालले आहे. ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ’, अशा पद्धतीने यांची कारवाई सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान आहे. महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा आज खरा चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करण्याची ही काँग्रेसची संस्कृती आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात काँग्रेसने संपूर्ण महिला शक्तीचाच अवमान केला आहे. हा अपमान महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही विसरणार नाहीत. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. महिलांचा अपमान करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. 2024 मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी काँग्रेसला लोकशाही मार्गाने उत्तर दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्यांना पुन्हा एकदा जनताच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसने राजकीय विरोध करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, महिलांचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा सपकाळांची प्रेस सुरू असताना राष्ट्रवादीचा राडा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले- गुंगी गुडिया ही शिवी नाही, सुनेत्रा पवारांनी स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करावं काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून सुरू असलेला राजकीय वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दाचे ठामपणे समर्थन केले आहे. “गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,” असे थेट आव्हान सपकाळ यांनी दिले आहे. सपकाळ यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले. वाचा सविस्तर
Source link
'इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिले':CM फडणवीसांचे प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे म्हणाले- सुनेत्रा पवारांचा नव्हे तमाम माता-भगिनींचा अपमान