![]()
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘कॉक्रोच जनता पक्षा’च्या कार्यकर्त्यांना सामाजिक प्रश्नांवर आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी, एकामागोमाग एक राजीनामे मागण्यासाठी शक्ती वाया घालवू नका, असे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, अण्णा वायदंडे, ब्राह्मण आघाडीचे ॲड. मंदार जोशी, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, नगरसेवक निलेश आल्हट, ॲड. हुलगेश चलवादी, बसवराज गायकवाड, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे, निलेश रोकडे, सुनील गवळी, मुश्ताक बाबर, श्रीकांत कदम आणि जयदेव रंधवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आठवले यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थी, तरुण, महिला, वंचित, शेतकरी आणि भूमिहीन यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलने करणे योग्य आहे. मात्र, एका मंत्र्याचा राजीनामा मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्याचा राजीनामा मागण्यासाठी पुन्हा आंदोलने करू नयेत. विद्यार्थ्यांना अशा आंदोलनांमध्ये सहभागी करण्याऐवजी त्यांना विधायक कार्यक्रम आणि आर्थिक उन्नतीसाठी वेळ देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुसंवादाचा अभाव असल्याचे आठवले यांनी नमूद केले. लोकशाहीच्या पूर्णत्वासाठी दोघांनीही एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. विरोधकांनी सरकारच्या चांगल्या कामांचे स्वागत करावे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मागण्या आणि मते संवादातून समजून घ्यावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित राहत नाहीत, हा विरोधकांचा आरोप निरर्थक असल्याचे आठवले म्हणाले. शहा हे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री आहेत. सभागृहात ज्या मंत्र्याच्या विभागाशी संबंधित कामकाज असते, त्या मंत्र्याने उपस्थित राहणे अपेक्षित असते आणि शहा ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा आरोप करणे चुकीचे आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणेही चुकीचे असल्याचे आठवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे, नागरिकांच्या गाड्या बंद पडण्यासाठी नाही. इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये बिघाड होत असल्यास तांत्रिक तपासणी करून आवश्यकतेनुसार निर्णय मागे घ्यावा, पण गडकरींसारख्या कार्यक्षम मंत्र्याचा राजीनामा मागणे साफ चुकीचे आहे, असे आठवले यांनी म्हटले.
Source link
रामदास आठवले यांचे 'कॉक्रोच जनता पक्षाला' आवाहन:राजीनाम्यांसाठी नव्हे, सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा