Headlines

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील करोडी-तेलवाडी मार्ग झाला जीवघेणा:रस्त्यावर पावसाचे पाणी, रात्रीच्या वेळी पथदिवेही राहतात बंद‎




सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील करोडी ते तेलवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली असून हा मार्ग सध्या वाहनधारकांसाठी अत्यंत जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि पसरलेली माती यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा खड्डे बुजवेपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद करावी; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात कृती समितीचे अध्यक्ष इंजि. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मनीष मानकर यांना एक सविस्तर निवेदन सादर केले. २०२१ मध्ये तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून करोडी ते तेलवाडी हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही काळातच रस्त्याची चाळणी झाली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, गल्लेबोरगाव, कन्नड शहर आणि अंधानेर फाटा येथे पुलांची अत्यंत गरज असताना ती वेळेत लक्षात आली नाही. अनेकांना प्राण गमवावे लागल्यानंतर सुरू झालेली या तीन पुलांची कामे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत. पर्यायी वळण रस्ते, सुस्पष्ट दुभाजक आणि सावधगिरीचे फलक नसल्याने दररोज अपघात होत आहेत. तसेच हतनूर व कन्नड कारखाना पुलावरील पथदिवे बंद असल्याने तेथे अंधाराचे साम्राज्य आहे. टोलनाका व विश्रांती स्थळावरील स्वच्छतागृहांची दूरवस्था झाली असून तेथे पाण्याचीही सोय नाही. या रस्त्याचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी इंजि. मिलिंद पाटील, डॉ. संजय गव्हाणे, डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, आकाश बोलधने, माणिक आबा पगारे, डॉ. सीताराम जाधव, भाऊसाहेब थोरात, योगेश खोसरे, फरीन बेगम अब्दुल जावेद, अब्दुल जावेद सेठ, गोकुळ राठोड, मनोज पवार, पवन ठाकूर, प्रकाश अग्रवाल, रत्नाकर पंडित आणि गोविंद भारुका आदींनी केली आहे. दरम्यान, रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *