Headlines

घाटनांद्रा घाटाची दुरवस्था, जागोजागी खड्डे; संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा धोका:रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी, महिनाभरापासून बससेवा बंद, प्रवाशांचे हाल‎




राज्य महामार्ग क्रमांक ४८ वरील घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील अपघातांचा धोका वाढला आहे. घाटातील रस्त्यावरील खोल खड्डे, खचलेले भाग तसेच धोकादायक वळणांवर कठडे व संरक्षणभिंतींचा अभाव लक्षात घेऊन सिल्लोड आणि पाचोरा आगाराने गेल्या महिनाभरापासून बससेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे. परिणामी विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे. घाटनांद्रा–पाचोरा हा मार्ग खान्देशसह पुढे सुरत (गुजरात)कडे जाण्यासाठी महत्त्वाचा आणि तुलनेने कमी अंतराचा असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सिल्लोड व पाचोरा आगाराच्या बसेसही नियमित धावत असून त्यांना चांगला प्रवासी प्रतिसाद व उत्पन्न मिळत होते. मात्र घाटातील रस्त्याची बिकट अवस्था आणि धोकादायक वळणांवर सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरदारांना कामासाठी, शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी तर व्यावसायिकांना दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पावसाळ्यात घाटातील रस्ता खचल्याने तब्बल चार महिने बससेवा बंद होती. त्यावेळी कन्नड तालुक्याच्या आमदार संजना जाधव यांनी पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर करण्यात आलेली दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपाची ठरल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटातील रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, धोकादायक वळणांवर मजबूत कठडे व संरक्षणभिंती उभाराव्यात आणि बंद असलेली बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निलेश बिसेन, शुभम सोनवणे,सतीष जोशी, रंगनाथ मोरे, सुरेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, रवी निकम यांच्यासह परिसरातील प्रवाशांनी केली आहे. अनेक वळणांवर कठडे नसल्याने मोठ्या अपघाताची भीती घाटातील अनेक वळणांवर कठडे नसल्याने मोठ्या अपघाताची भीती कायम आहे. पावसाळ्यात धोका अधिक वाढतो. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणभिंती व कठडे उभारणे अत्यावश्यक आहे. -सुरेश गायकवाड, नागरिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *