![]()
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला नियमबाह्य आणि ‘व्हीआयपी’ सुविधा दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपी वाल्मिक कराडची तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी आणि त्याला मदत करणाऱ्या कारागृह पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, राजकीय प्रभावाचा वापर करून त्याला तुरुंगात सर्व सुखसोयी पुरवल्या जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कारागृह अधीक्षकांना एक सविस्तर पत्र लिहून तुरुंगातील गैरप्रकारांची पोलखोल केली आहे. याच पत्राचा संदर्भ देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. धनंजय देशमुख यांनी पत्रात केलेले गंभीर आरोप आरोपी वाल्मिक कराड हा तुरुंगात इतर कैद्यांच्या नावाचा वापर करून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी सर्रास संपर्क साधत आहे. दुपारच्या वेळी जेव्हा कैद्यांना बराकमध्ये बंद केले जाते, तेव्हा या आरोपीला थेट अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉलची सुविधा पुरवली जात आहे. कारागृहातील बराक क्रमांक 9 जवळ असलेल्या फोनजवळ जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला नाही, जेणेकरून आरोपीचे संभाषण रेकॉर्ड होऊ नये. वाल्मिक कराड हा कारागृहात बसूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकत असून, इतर आरोपींच्या मदतीने बाहेर दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागण्या या संपूर्ण प्रकाराला ‘न्यायप्रक्रियेचा थेट अपमान’ ठरवत सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत. बीडमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी आरोपी वाल्मिक कराड याला तातडीने बीड कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात यावे. बीड कारागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज, फोनचे कॉल लॉग आणि भेट नोंदवही त्वरित जप्त करून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी व्हावी. एका हत्या प्रकरणातील आरोपीला राजाश्रय देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या सर्व संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. पीडित देशमुख कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य असून, त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही राहू, असा स्पष्ट इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तुरुंगातील या धक्कादायक प्रकारामुळे आता राज्याचे गृहखाते आणि कारागृह प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… खिळाही ठोकला नाही, तो महापौर बंगल्याचा खर्च नाही:चौफेर टीकेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचे स्पष्टीकरण, वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेतील कथित कोट्यवधींच्या खर्चावरून आणि जुहू चौपाटीच्या स्वच्छतेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 5 कोटींचा खर्च दाखवणारे वादग्रस्त टेंडर चुकीचे असल्याचे सांगत, ते तत्काळ मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरून चुकीचे नरेटिव्ह पसरवणाऱ्या ठाकरे गटावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
हत्येतील आरोपीला तुरुंगात VIP ट्रिटमेंट!:वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी