Headlines

तंत्रज्ञान युगात आरोग्य जागरूकता आवश्यक- अमृता फडणवीस:डॉ. कोठारी, भुते यांच्या 'पाठ फिरवा पाठदुखीकडे' पुस्तकाचे प्रकाशन




डॉ. अजय कोठारी आणि डॉ. अभिनव भुते यांनी लिहिलेल्या ‘पाठ फिरवा पाठदुखीकडे’ या पुस्तकाच्या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. दिविजा फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी सध्याच्या तंत्रज्ञान केंद्रित युगात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्यविषयक जागरूकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, डिजिटल उपकरणांवरील वाढते अवलंबित्व, एकाच जागी बसून दीर्घकाळ काम करणे, बसण्याची चुकीची पद्धत आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे सध्या पाठीच्या व मानदुखीच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मणक्याचे आजार या विषयातील ख्यातनाम तज्ज्ञ असलेल्या डॉ. कोठारी आणि डॉ. भुते यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती, उद्योजक सौरभ बोरा, मृणाल पवार, पुस्तकाचे दोन्ही लेखक, रमेश कोठारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अमृता फडणवीस यांनी पुढे सांगितले की, उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी ठरतो, मात्र प्रतिबंधाची सुरुवात जागरूकतेपासून व्हायला हवी. निरोगी व सक्रिय आयुष्यासाठी आपल्या शरीराला समजून घेणे आणि आरोग्याला पूरक अशा जीवनशैलीची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मणक्याच्या सुदृढतेसाठी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकरिता हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मृणाल पवार म्हणाल्या, आजची पिढी तंत्रज्ञानाशी सातत्याने जोडलेली असली तरी ती स्वतःच्या आरोग्यापासून दूर जात आहे. मणक्याच्या आरोग्याविषयीची चर्चा केवळ वेदनांवरील उपचारांपुरती मर्यादित नसून, ती आयुष्यात संतुलन राखणे, जागरूकता निर्माण करणे आणि एकूण जीवनमान सुधारण्याशी संबंधित आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून दोन दिग्गज डॉक्टरांचे ज्ञान आणि तब्बल दोन दशकांचा वैद्यकीय अनुभव वाचकांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रापुढील नव्या आव्हानांवर प्रकाश टाकताना डॉ. अजय कोठारी यांनी सांगितले की, मानदुखी व पाठीची दुखणी आता केवळ ज्येष्ठांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. स्क्रीनचा जास्त वापर, मैदानी हालचालींचा अभाव, व्यायामाची कमतरता, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि अयोग्य जीवनशैली यामुळे तरुण वर्गात या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. समस्या गंभीर होण्यापूर्वी लोकांनी ती समजून घ्यावी आणि साध्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे, या उद्देशाने आम्ही हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. पराग संचेती यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली अत्यंत कमी झाल्याचे नमूद केले. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आणि वेळेवर निदान व उपचारांसाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. निरोगी शरीरासाठी शिस्त, नियमित व्यायाम, शरीराचे योग्य वजन राखणे, पुरेशी विश्रांती आणि मानसिक शांती या पाच मूलभूत सूत्रांचा उल्लेख डॉ. संचेती यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *