![]()
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. बैठकीत शिबिराच्या नियोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. रक्तदान शिबिरासाठी आवश्यक सुविधा, रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, रक्तसंकलनासाठी आवश्यक साहित्य, नागरिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था, विविध आजारांच्या प्राथमिक तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, औषध वितरण तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. महापौर श्रीचंद तेजवानी यांनी संबंधित विभागप्रमुख, आरोग्य अधिकारी व आयोजन समितीच्या सदस्यांना शिबिराचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या.शिबिर स्थळी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महापौरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता नाना आमले, डॉ.राजेंद्र तायडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज खान, स्वास्थ अधीक्षक विजय बुरे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, सफाई कर्मचारी उपस्थित होते. आवर्जून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, तसेच आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. त्यांच्या सहभागामुळे समाजात रक्तदान आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत सकारात्मक संदेश जाईल, असेही नमूद करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मदत होईल. नियमित आरोग्य तपासणीमुळे वेळेत उपचार होतात, असे विचार व्यक्त झाले.
Source link
14 ऑगस्टला रक्तदानासह महाआरोग्य शिबिर:नियोजनासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक