![]()
कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध सामाजिक व विकासाभिमुख उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यादरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांचा ग्रामपंचायत नादरपूर आणि संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने गुरुवारी नागरी सत्कार करण्यात आला. आ. संजना जाधव यांनी विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, नादरपूर फाटा ते गौरपिंपरी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम आगामी पावसाळा संपताच तात्काळ सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक करत आ. जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. तसेच, परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषतः लहान मुलांसाठी बचत खाते काढण्याची सुविधा उपलब्ध असून, पालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच लक्ष्मण बळी, सुभाष निकम व रामहरी निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष बनकर यांनी मानले. या वेळी जि. प. सदस्य पवार, पाडसवान, जंगले, कैकशा पठाण यांच्यासह उपस्थित होते.
Source link
नादरपूर:आमदार संजना जाधव यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन