Headlines

पैठण:राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा




जगप्रसिद्ध पैठणीच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देत १२ वा राष्ट्रीय हातमाग दिन पैठणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बुनकर सेवा केंद्र, मुंबई यांच्या वतीने श्रीक्षेत्र नाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात पैठण तालुक्यातील पैठणी विणकर महिला मंडळाच्या सदस्यांसह शेकडो विणकर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक हातमाग कलेचा वारसा जपणाऱ्या विणकरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार विलास भुमरे, वर्षा विलास भुमरे, नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले तसेच वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वसंत घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी पैठणी विणकरांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना मान्यवरांनी पैठणी ही केवळ एक साडी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव, पैठणची ऐतिहासिक ओळख आणि हजारो विणकर कुटुंबांच्या कष्टाचे जिवंत प्रतीक असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही हातमाग उद्योग टिकवून ठेवण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात पैठणी उद्योगासमोरील आव्हाने, विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला हातमाग व्यवसायाकडे आकर्षित करणे आणि पारंपरिक कलेचे संवर्धन यावरही चर्चा झाली. हातमाग उद्योगाला बळकटी मिळाल्यास ग्रामीण भागातील रोजगाराला चालना मिळून पैठणी उद्योगाची जागतिक स्तरावर अधिक प्रभावी ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भुषण कावसानकर, तुषार पाटील, जितू परदेशी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *