![]()
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मिरची बाजारात प्रतिकिलो तब्बल ६ रुपयांची दरतफावत आढळून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. व्यापाऱ्यांकडून लिलावादरम्यान जाहीर होणारे दर आणि शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पडणारा भाव यात मोठी दरी असल्याने मिरची उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. मिरचीसारख्या नगदी पिकात प्रति किलो काही रुपयांचा फरकही क्विंटलमागे शेकडो रुपयांचे, तर मोठ्या प्रमाणात माल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे हजारो ते लाखो रुपयांचे नुकसान करत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात मिरचीची मोठी आवक सुरू आहे. वाढता खत-औषधांचा खर्च, मजुरी, वाहतूक आणि सिंचन खर्चामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अपेक्षित भाव मिळण्याऐवजी प्रत्यक्ष व्यवहारात कमी दर मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. बाजार समितीत जाहीर होणारा कमाल व सरासरी दर पाहून शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. मात्र, प्रत्यक्ष लिलावाच्या वेळी व्यापाऱ्यांकडून कमी बोली लावली जाते. त्यानंतर वजनकाटे, दर्जानिहाय कपात, आर्द्रता कपात, हमाली आणि वाहतूक कपातीमुळे अंतिम रक्कम अत्यंत कमी होते. परिणामी, जाहीर दर आणि हातात पडणारा भाव यात प्रतिकिलो ६ रुपयांपर्यंतची तफावत निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने १० क्विंटल मिरची विकल्यास त्याला थेट ६,००० रुपयांचा फटका बसतो; लिलाव सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली व्हावी, डिजिटल फलकावर दर प्रदर्शित व्हावेत, व्यापाऱ्यांच्या बोलीची नोंद सार्वजनिक करावी, दरपत्रकाची पावती द्यावी आणि भावाची माहिती एसएमएसद्वारे द्यावी आदी मागण्या आहेत. लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करावी मिरची उत्पादनासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणी यावर मोठा खर्च केला. बाजार समितीत जाहीर दर पाहून माल आणला पण प्रत्यक्ष विक्रीवेळी प्रतिकिलो ६ रुपये कमी भाव मिळाला. शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. बाजार समित्यांनी लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करावी आणि जाहीर दराप्रमाणेच भाव मिळेल याची हमी द्यावी, अशी मागणी शेतकरी विनोद लहाने यांनी केली आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करू ः सभापती विश्वास दाभाडे बाजार समितीत मिरचीची लिलाव प्रक्रिया नियमानुसार आणि खुल्या पद्धतीने केली जाते. दर निश्चिती ही मालाचा दर्जा, गुणवत्ता, मागणी-पुरवठा आणि बाजारातील स्पर्धात्मक बोली यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांकडून दरातील तफावतीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर दखल घेऊन तपास केला जाईल. लिलाव प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना करू आणि शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापऱ्यावर कारवाई करू.
Source link
मिरची दरात 6 रुपयांच्या तफावतीने शेतकऱ्यांचे लाखोंचे होतेय नुकसान:सिल्लोड बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी