Headlines

ठाकूर निमगावची वेस जीवघेणी ठरण्याआधी हटवा:संरचनात्मक परीक्षण करून दुरुस्ती अथवा नवीन गाववेस उभारावी‎




ठाकूर निमगाव येथील मुख्य प्रवेशद्वारावरील जुनी गाववेस (कमान) जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ॲड. लक्ष्मण मडके व साईनाथ कातकडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंचायत समिती, शेवगाव येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या गाववेसीच्या वरच्या भागात पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय कार्यरत होते. सध्या इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून बांधकाम कमकुवत झाले आहे. गावातील मुख्य रहदारीचा रस्ता याच कमानीखालून जात असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, दुचाकी-चारचाकी वाहने तसेच शेतीची वाहने दररोज या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे कमान कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोका अधिक वाढला असून, रचना कोसळल्यास जीवित व वित्तहानी होण्याची भीती अर्जदारांनी व्यक्त केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी गाववेसीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून सक्षम अभियंत्यामार्फत संरचनात्मक परीक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दुरुस्ती शक्य असल्यास ती तातडीने करावी; अन्यथा जीर्ण गाववेसचे निर्लेखन करून त्याच ठिकाणी सुरक्षित व मजबूत नवीन गाववेस उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा, अशीही मागणी आहे. तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,अशी भूमिका ॲड. मडके व कातकडे यांनी मांडली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *