Headlines

उत्कृष्ट तपास करणाऱ्या 22 पोलिसांना पदक:पोलीस महासंचालक दाते यांचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन




पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पोलिसांना गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. हे पदक जबाबदारीचे असून, नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी ते आदर्श ठरेल, असेही दाते यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्यातील सन २०२३ आणि २०२४ मधील उत्कृष्ट तपासासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना हे पदक प्रदान करण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सीआयडीचे प्रमुख सुनील रामानंद, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, दीपक पांडे आणि सुनील फुलारी उपस्थित होते. दाते म्हणाले की, २२ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देऊन सत्कार होणे ही राज्याच्या पोलीस दलासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या यशात कुटुंबाचा मोठा आधार असतो. महिला अधिकारी कुटुंब सांभाळून पोलीस दलात काम करतात, ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. पूर्वी पोलीस विभागात पारंपरिक पद्धतीने पदके मिळत नव्हती, याची खंत अनेकांना होती. दिल्लीत डेप्युटेशनवर असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गणवेशावर पदक लावण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर ओडिशाचे आयपीएस अभय सर यांच्या माध्यमातून हे पदक प्रदान करणे सुरू झाले, असे दाते यांनी सांगितले. या पदकातील प्रतिमेतून सूचक बोध घेता येतो; धर्मचक्र अभिमानाने छातीवर लावताना पोलिसांनी धर्माने वागले पाहिजे. चुकीच्या लोकांवर कारवाई करून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुनील रामानंद यांनी माहिती दिली की, २०२३ आणि २०२४ मधील गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४४ जणांचे प्रस्ताव सीआयडीमार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यापैकी २२ जणांना हे पदक प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *