Headlines

राजकीय वैर बाजूला ठेवत धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांची भेट:दिवंगत डॉ. डी.वाया पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा




पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनानंतर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली या दोन नेत्यांची घट्ट मैत्री 2012 नंतर संपुष्टात आली होती आणि तेव्हापासून त्यांच्यात तीव्र राजकीय वैर निर्माण होऊन त्यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतली होती. मात्र, या कठीण आणि दुःखाच्या प्रसंगी जुने राजकीय वाद विसरून खासदार महाडिक यांनी घेतलेली ही सांत्वनपर भेट राजकीय वर्तुळात प्रगल्भतेचे दर्शन घडवणारी आणि विशेष लक्षवेधी ठरली आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून, खासदार धनंजय महाडिक यांनी पत्नी अरुंधती महाडिक यांच्यासह कसबा बावडा येथे जाऊन पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. आमदार सतेज पाटील आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी संवाद साधताना खासदार महाडिक यांनी दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या आणि जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. “पराभवाने खचून जाऊ नकोस..” या सांत्वनपर भेटीदरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या एका खास आठवणीला उजाळा दिला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. पाटील यांनी आपल्याला, ‘पराभवाने खचून जाऊ नकोस, पुढे नक्की यश मिळेल,’ असा मोलाचा सल्ला देत धीर दिला होता. त्यांच्या याच शब्दांमुळे प्रेरणा घेऊन 2014 मध्ये आपण खासदार झालो, अशी कृतज्ञता महाडिक यांनी व्यक्त केली. यासोबतच, आमदार सतेज पाटील आणि संजय पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र अत्यंत कर्तृत्ववान असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला. अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापुरात जनसागर अनेकांना जगण्याचे बळ देणाऱ्या, हजारो कुटुंबांना आधार देणाऱ्या आणि देशाच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या शिक्षणमहर्षी, ज्ञानतपस्वी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापुरात अक्षरशः जनसागर लोटला होता. कसबा बावडा येथील ‘यशवंत’ निवासस्थानाहून फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. आपल्या या लाडक्या लोकनेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. ‘अमर रहे, अमर रहे… डी. वाय. दादा अमर रहे’ या घोषणांनी परिसरातील वातावरण अत्यंत भावूक झाले होते. अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदान येथे पोहोचल्यानंतर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या पार्थिवाला पोलिस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. अत्यंत विद्वान, कर्तृत्ववान आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेल्या सर्वांच्या लाडक्या ‘डी. वाय. दादां’ना निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. लाखो नागरिकांच्या साश्रूनयनांच्या साक्षीने हे महान व्यक्तिमत्त्व अखेर अनंतात विलीन झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *