![]()
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी जात प्रमाणपत्रे मिळू लागल्याने बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणे आणि काहींची मिळालेली प्रमाणपत्रे थेट रद्द करण्याच्या प्रकारांमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट धारेवर धरले असतानाच, आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही प्रशासकीय यंत्रणेला लक्ष्य केले आहे. जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असून, काही जण स्वतःचा ‘अतिहुशारपणा’ दाखवून अडवणूक करत असल्याचा घणाघात नरेंद्र पाटील यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असून, काही जण स्वतःला ‘अतिहुशार’ समजत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. विशेषतः महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि शर्तींवर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकारी स्वतः मराठा समाजाचे असूनही अशा अटी का लादत आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा या प्रशासकीय आडमुठेपणाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे मराठा समाजातील तरुणांचे मोठे नुकसान होत असून, हे असेच सुरू राहिल्यास मराठा तरुणांना एकत्रित करून सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा थेट इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. 2025 मध्ये प्रमाणपत्र मिळवून महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या अनेक तरुणांना कागदपत्रे अपलोड करता न आल्याने ते लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, याबाबत अनेक तरुणांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या या आडमुठ्या निर्णयांविरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने पाटील यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या प्रश्नावर तरुणांना संघटित करून जनजागृती करण्यासाठी त्यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केला असून, ‘जोपर्यंत आपण सर्वजण एकत्र येणार नाही, तोपर्यंत सरकारला आपला आक्रोश समजणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत त्यांनी तीव्र आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे.
Source link
'काही अधिकारी स्वतःला 'अतिहुशार' समजतात!':जात प्रमाणपत्रांवरून नरेंद्र पाटील भडकले, सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा