Headlines

एनएचएमच्या 525 उमेदवारांची यादी अंतिम:10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकडे लक्ष




राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दीड हजाराहून अधिक डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांपैकी ५२५ उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व उमेदवारांची यादी शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी खास दूतामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रवीण पारिसे यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, पुढील प्रक्रियेबाबत शासनाने अद्याप काहीही स्पष्ट केले नसल्याचे सांगितले. राज्य शासनाने आरोग्य विभागासाठी समांतर यंत्रणा म्हणून एनएचएमची स्थापना केली आहे. या यंत्रणेअंतर्गत जिल्ह्यात दीड हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये शिपाई, पट्टीबंधक, परिचारिका, समुपदेशक यांच्यापासून ते डॉक्टरांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरुग्णालय तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्यवर्धिनींमध्ये हे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीच्या असल्याने त्यांना अत्यंत मर्यादित स्वरूपात लाभ मिळतात. आरोग्य विभागातील नियमित डॉक्टर्स आणि परिचारिकांसारखीच कामे करत असतानाही त्यांच्या वेतनात मोठी तफावत असल्याने या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने अमरावतीसह राज्यभरातील कर्मचाऱ्यांमार्फत ३० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० वर्षांची सेवा पूर्ण झाल्याचा निकष ठेवण्यात आला आहे. या निकषानुसार, ज्या ५२५ डॉक्टर्स, परिचारिका, समुपदेशक आणि इतर कर्मचाऱ्यांनी १० वर्षांची सेवा पूर्ण केली आहे, त्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. या यादीमध्ये उमेदवारांच्या आतापर्यंतच्या नोकरीचा एकूण कालावधी, त्यातील खंड, शैक्षणिक पात्रता यासह संपूर्ण तपशील समाविष्ट आहे. गेल्या दोन दिवसांत २२४ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्याही यात करण्यात आल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट होती, तर काहींच्या नेमणूक आणि खंड कालावधीच्या तारखा चुकीच्या होत्या. तसेच, काही कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेची स्पष्ट माहिती यादीत समाविष्ट नव्हती. आता शासन नवीन भरती प्रक्रिया कधी सुरू करते आणि या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी कधी मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी तब्बल ५२ दिवसांचा प्रदीर्घ संप केला होता. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेसमोरच काळी दिवाळी साजरी केली होती आणि संपादरम्यान आलेले सर्व सण-उत्सव आंदोलनस्थळीच साजरे केले होते. तत्कालीन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या आंदोलनकर्त्या महिलांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती मदतही केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *