![]()
अमरावती शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात कोरोनामुळे थांबलेली ‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेने याची घोषणा केली असून, आगामी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर ५ सप्टेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव राजेंद्र वर्मा आणि उपाध्यक्ष माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. कोरोना काळापासून विविध कारणांमुळे या आयोजनात खंड पडला होता. यावर्षीच्या दहिहंडीची उंची ३० फूट ठेवली जाणार आहे. या आयोजनासाठी नेहमीप्रमाणे सर्व गोविंदा पथकांना माहिती देण्यात आली असून, त्यापैकी निवडक पथकांनाच स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल. दरवर्षीप्रमाणे सर्वपक्षीय पुढारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दहिहंडीच्या बक्षीसांची रक्कम, गोविंदा पथकांच्या समावेशाची मर्यादा आणि नोंदणीबाबतचे तपशील येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. जुन्या पिढीतील आनंददायी प्रसंग नव्या पिढीसमोर उभे करण्याचा या संघटनेचा नेहमीच मानस असतो. दहिहंडीचा उत्सव हा त्यापैकीच एक आहे, जो गोपाळकाल्याच्या दिवशीच साजरा करण्यावर संघटनेचा कटाक्ष असतो. संघटनेचे उपाध्यक्ष बबनराव रडके यांनी आठवण करून दिली की, एकावर्षी तर चक्क स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी हे आयोजन साजरे केले गेले होते. नवयुवक विद्यार्थी संघटना दहिहंडीव्यतिरिक्त इतरही अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवते. यामध्ये चैत्रारंभाच्या दिवशी उंच गुढीची उभारणी, कोजागिरी पौर्णिमा, भुलाबाईंची गाणी, इदमिलन आणि २६/११ च्या शहीदांचे स्मरण आदींचा समावेश आहे. नवरात्रोत्सवात राजकमल चौकात अल्पदरात फराळ व पुरी-भाजीचे वितरणही संघटनेतर्फे नियमितपणे केले जाते. यावेळी द्वितीय सचिव महेश साहू, कोषाध्यक्ष विकास पाध्ये, कार्यालयीन सचिव राजेंद्र बाळापुरे, दीपक शर्मा, अतुल टाले, जनसंपर्क प्रमुख किशन जाधव, सल्लागार समितीचे सदस्य दिलीप मेहरे, बी.डी. उर्फ बाळासाहेब देशमुख, राजूभाऊ परिहार, अनिल मुणोत, सोमेश्वर सोनटक्के, तरुणभाई धुवाविया, वसंतराव देशपांडे, नंदूभाऊ देशमुख, राजू खेर, भूषण परिहार, प्रतीक देशमुख, मिलींद लेंगे, धनंजय देशमुख, प्रवीण अग्रवाल, आदित्य कोरडे, ओम सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
राजकमल चौकात 'आपली दहिहंडी' पुन्हा होणार:नवयुवक विद्यार्थी संघटनेची घोषणा, उंची 30 फूट असेल