Headlines

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक कात्री!:राज्यात गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागले; जाणून घ्या प्रतिलिटरचे नवीन दर




सर्वसामान्यांना आता आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. राज्यातील दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ येत्या मंगळवारपासून म्हणजेच ११ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे. दुधासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थही महागणार असल्याने ग्राहकांच्या खिशावरील आर्थिक ताण आणखी वाढणार आहे. नवीन दर नेमके काय असतील? डेअरी असोसिएशनने लागू केलेल्या नवीन बदलानुसार आता ग्राहकांना दुधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील: गाईचे दूध: सध्याचा प्रतिलिटर ६० रुपये असलेला दर आता ६२ रुपये होईल. म्हशीचे दूध: सध्याचा प्रतिलिटर ७६ रुपये असलेला दर आता ७८ रुपये होईल. दुग्धजन्य पदार्थ: दही, ताक, तूप, पनीर यांसारख्या विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरामध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. कुठे झाला दरवाढीचा निर्णय? राज्यातील खाजगी आणि सहकारी डेअरी संस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघा’ची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाढलेल्या उत्पादन खर्चाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर दरवाढीच्या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. दरवाढ का करावी लागली? डेअरी असोसिएशनने या दरवाढीमागील मुख्य कारणे स्पष्ट केली आहेत. गेल्या काही काळापासून दूध उत्पादन आणि प्रक्रियेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे: इंधन आणि वाहतूक: डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. कच्चा माल: साखरेचे दर प्रतिकिलो १२ रुपयांनी वधारले आहेत. पॅकेजिंग: दुधाच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे दूध व्यावसायिक आणि उत्पादकांवर मोठा आर्थिक ताण येत होता. त्यामुळे या खर्चाचा मेळ बसवण्यासाठी आणि उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला देण्यासाठी ही २ रुपयांची दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा: ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; जायकवाडी धरण भरले, 8 दरवाजे उघडले राज्यात पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज वर्तवला जात असतानाच, भारतीय हवामान विभागाने मात्र एका मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह गारपीट होण्याचा मोठा धोका असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *