Headlines

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा संवैधानिक ढाचा उद्ध्वस्त करण्याचा डाव:नाना पटोले यांचा भाजप अन् मोदी सरकारवर गंभीर आरोप




भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डिलिमिटेशनच्या नावाखाली देशातील घटनात्मक आणि संवैधानिक व्यवस्थेला तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी महिला आरक्षणाचा वापर केवळ एक ढाल म्हणून केला जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा संसदेत संमत झाला आणि घटनादुरुस्तीही झाली, मग लगेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते लागू का केले गेले नाही? असा थेट सवाल पटोले यांनी केला आहे. आता 33 टक्के आरक्षण मंजूर झाल्यानंतर पुन्हा 50 टक्क्यांची भाषा केली जात आहे. मग जेव्हा 33 टक्के मंजुरीची वेळ होती, तेव्हाच 50 टक्के आरक्षण का आणले नाही? असा सवाल पटोले यांनी केला आहे. संवैधानिक ढाचा तोडण्याचा प्रयत्न नाना पटोले म्हणाले की, महिलांना पुढे करून त्या माध्यमातून संवैधानिक ढाचा आणि व्यवस्था नष्ट करण्याचा भाजपचा हा एक मोठा राजकीय प्लॅन असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने आपल्या छोट्याशा फायद्याचा विचार न करता या डिलिमिटेशनच्या बिलाला विरोध केला पाहिजे आणि हे बिल संसदेत पडलेच पाहिजे, असे जाहीर आवाहन पटोले यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले. सुप्रिया सुळेंच्या भेटीगाठींवर प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसब शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले की, सुप्रिया सुळे यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांनी कोणाला भेटावे किंवा कोणाला भेटू नये, हा पूर्णपणे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसचे स्पष्ट आणि ठाम आवाहन आहे की, महिला आरक्षणाचा आडोसा घेऊन होणाऱ्या डिलिमिटेशनच्या प्रक्रियेला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. विजय चौधरी प्रकरणावरून पक्षावर ताशेरे वादग्रस्त ठरलेले विजय चौधरी यांच्या प्रकरणावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. विजय चौधरी यांची नेमकी मानसिकता काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र गेली अनेक दिवस ऐकत आणि पाहत आहे. हे प्रकरण जेव्हा अत्यंत मोठे झाले आणि राजकीय दबाव वाढला, तेव्हाच शेवटी चौधरींचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, हे प्रकरण चिघळेपर्यंत आणि प्रकरण हाताबाहेर जाईपर्यंत संबंधित पक्षाने त्यांच्यावर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई केली नव्हती, असे सांगत पटोले यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *