![]()
चिमुकलीचे बालपण नुकतेच उमलत होते. शाळेचे दप्तरं, मित्र-मैत्रिणी आणि आई-वडिलांच्या स्वप्नांनी भरलेले तिचे छोटेसे जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले. सकाळी शाळेत जाताना ज्या बसमधून ती आनंदाने निघाली, त्याच बसने दुपारी तिचे प्राण हिरावून घेतले. रिध्दपूरच्या या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेने प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे. आपली मुले शाळेत पाठवताना त्यांची सुरक्षितता खरोखरच सुनिश्चित आहे का? सकाळी हसतमुखाने शाळेत गेलेली सहा वर्षांची चिमुकली दुपारी घरी परतली, मात्र आई-वडिलांच्या कुशीत जाण्याआधीच काळाने तिच्यावर झडप घातली. ज्या स्कूल बसने तिला शाळेत नेले, त्याच बसच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक चिमुकलीचे नाव ईश्वरी रवींद्र ठाकरे (६, रा. रिध्दपूर, ता. मोर्शी) असे आहे. ईश्वरी चांदूरबाजार येथील एका खासगी शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती. रोजप्रमाणे शनिवारी सकाळी ती शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. रिध्दपूर ते चांदूरबाजार असा शाळेचा प्रवास करण्यासाठी तिच्या वडिलांनी ईश्वरीसाठी स्कुल बसची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी शाळा आटोपल्यानंतर साडेअकरा ते बाराच्या सुमारास ईश्वरी आणि तिच्यासोबतचे अन्य विद्यार्थी स्कूल बसने रिध्दपूर येथील बाजार चौकात उतरले. बसमधून खाली उतरल्यानंतर काही विद्यार्थी पुढे गेले. ईश्वरीही आपले घर गाठण्यासाठी बसजवळून पुढे जात होती. याच वेळी चालकाने बस मागे घेण्यास सुरुवात केली. मात्र बस मागे घेताना मागील बाजूस कोणी आहे किंवा नाही, याची पुरेशी खात्री केली नाही. अगदी बसजवळच असलेली ईश्वरी बसच्या पुढील चाकाखाली आली. या भीषण अपघातात ईश्वरीचा जागीच मृत्यू झाला. क्षणभरापूर्वी शाळेतून सुखरूप घरी परत येत असलेल्या चिमुकलीचा असा अंत झाल्याने घटनास्थळी एकच आक्रोश सुरू झाला. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार ईश्वर वर्गे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, स्कूल बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. चालकाचे नाव अक्षय रामदास कुरसंगे (२२, रा.पोरगव्हाण) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिध्दपूरच्या बाजार चौकात बस थांबली, त्यावेळी इतर काही विद्यार्थ्यांसह इश्वरी बसमधून खाली उतरली. त्यावेळी इश्वरी बसपासून जात असतानाच चालकाने बस मागे घेण्यास सुरूवात केली. यावेळी सर्व विद्यार्थी बसपासून दूर गेल्याची खात्री न करताच चालकाने बस मागे घेतली आणि बसचे समोरील चाक इश्वरीच्या अंगावरुन गेले आणि निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला. स्कुल बस सुरक्षेचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बसमध्ये महिला वाहक असणे आवश्यक असल्याचा नियम आहे. मात्र संबंधित बसमध्ये महिला वाहक नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बसमध्ये वाहक असता आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमधून उतरवून घराकडे रवाना केले असते, तर कदाचित ईश्वरीचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. या घटनेनंतर स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Source link
ज्या बसने शाळेत पोहोचवले, तिनेच ईश्वरीच्या आयुष्याचा प्रवास संपवला:स्कूल बस रिव्हर्स घेताना 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू