![]()
देशभरातील ४२ प्रकरणांमध्ये तब्बल ७.४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीसाठी बँक खाती पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, शनिवारी एका पोलिस अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती दिली. ऑनलाइन टास्कचे आमिष खार पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातून हे रॅकेट उघडकीस आले. गुन्हेगारांनी टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. “ऑनलाइन टास्क’ पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याला दाखवण्यात आले. त्यानंतर पीडित व्यक्तीला विविध बँक खात्यांमध्ये ४ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडून तिची फसवणूक करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणातून पर्दाफाश या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सायबर क्राइम हेल्पलाइन “१९३०’ आणि सायबर समन्वय पोर्टलवरून मिळालेल्या माहितीचे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. यातून अविनाश बाबासाहेब खरात आणि विकास गजानन भुजबळ यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे उघड झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. २२ बँक खात्यांचा वापर केल्याचे उघड आरोपींनी स्वतःच्या आणि इतरांच्या नावे बँक खाती उघडून ती सायबर भामट्यांना फसवणुकीचे व्यवहार करण्यासाठी दिली होती. पोलिसांनी आतापर्यंत एकूण २२ बँक खाती निष्पन्न केली आहेत. यात खरात याच्या नावावरील १३ आणि भुजबळ याच्या नावावरील ९ खात्यांचा समावेश आहे. सायबर फसवणुकीतून मिळवलेली मोठी रक्कम याच खात्यांमधून वळवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलिसांकडून पुढील शोध सुरू आहे.
Source link
7.42 कोटींची फसवणूक; सायबर रॅकेटचा पर्दाफाश:फसवणुकीसाठी बँक खाती पुरवल्याचे स्पष्ट