![]()
जायकवाडी धरण ९४ टक्क्यांहून अधिक भरल्याने पाण्याचा विहंगम नजराणा पाहण्यासाठी रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत हजारो पर्यटकांनी पैठणकडे धाव घेतली. सकाळपासूनच धरण परिसर आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या वर्दळीने फुलून गेले होते. दिवसभरात पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी नाथसागराला भेट दिल्याने संपूर्ण पैठणनगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सध्या जायकवाडी धरणात ९४.२९ टक्के जलसाठा असून, वरच्या भागातून ११ हजार ७०९ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. तर धरणाच्या सांडव्याद्वारे ९ हजार ८१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उघडलेली दारे आणि अथांग पसरलेला जलसाठा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. पर्यटकांच्या या ओघामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि लहान व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी येथे अधिक सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी दिली. धरण परिसरातील आणि भिंतीलगतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या धरणाचे उद्घाटन २४ फेब्रुवारी १९७६ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांनी सांगितले. पाण्याजवळ सेल्फी टाळण्याचे आवाहन : जायकवाडीत पाण्याचा प्रचंड साठा असल्याने पर्यटकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. पाण्याच्या जवळ जाऊन सेल्फी घेणे किंवा पाण्यात उतरणे धोक्याचे असून ते टाळावे, असे आवाहनकार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी केले आहे.
Source link
नाथसागराला पाच हजार पर्यटकांनी दिली भेट:धरणाच्या 18 दरवाजांतून सोडलेले पाणी पाहण्यास रविवारी दिवसभर गर्दी