![]()
धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असताना चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका व विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात आहे. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. धर्मांध शक्तींमुळे बुवाबाजीला खतपाणी विजय वडेट्टीवार म्हणाले, धर्मांध शक्ती सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड, बुवाबाजी या प्रकारांना खतपाणी मिळाले आहे. चंद्रपुरातही पैशाचा पाऊस पाडण्याच्या, गुप्ताधनाच्या आमिषाने गेल्या 2 वर्षांपासून अघोरी खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कासव, घुबड अशा दुर्मिळ वन्यजीवांसह अल्पवयीन मुली, विधवा महिलांचा पूजेसाठी वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचीही शक्यता आहे. स्व. नरेन्द्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अक्षरशः स्वतःचे प्राण त्यागले. त्यांच्या या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी हा मुद्दा उपस्थित केला होता. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची नियमावली बनवावी अशीही मी मागणी केली होती. अजून किती बळी गेल्यानंतर, किती महिलांचे शोषण झाल्यानंतर नियमावली होणार आहे? अशा प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणालेत. आत्ता पाहू नेमके काय आहे चंद्रपूरचे प्रकरण? चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गत 12 तारखेला 3 दुचाकींवरून 2 जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली. या आरोपींच्या मोबाइलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ व चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ, घुबड व कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुणी मुली व विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही पोलिसांना आढळले. आरोपींनी काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता. पण ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी 6 आरोपींना सध्या वनकोठडीत डांबण्यात आले आहे. पण या प्रकरणाचा मुख्य सत्रधार असलेला मांत्रिक व महाराज अद्याप फरार आहेत. हे प्रकरण लवकरच पोलिस विभागाकडे वर्ग केले जाणार आहे.
Source link
धर्मांध शक्ती सत्तेत असल्याने महाराष्ट्रात बुवाबाजीला खतपाणी:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा; दाभोलकरांची काढली आठवण