![]()
अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील साखळी नदीला पूर आला होता. या पुरामुळे गहजब झाला. दरम्यान पुरामुळे वारंवार दळणवळण प्रभावीत होत असल्याने या नदीवर पुलाची मागणी केली आहे. त्याचवेळी धामक ते अमरावती मार्गावर नियमित बससेवेचीही मागणी पुढे आली आहे.
.
पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधी (सी.आर.एफ.) अंतर्गत आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीत नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात एका दिवसात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मंगरूळ चव्हाळा परिसरात सुमारे पाच ते सहा फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वेळी साखळी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गंभीर अडचणींची माहिती त्यांना दिली. साखळी नदीच्या एका बाजूस अमरावती तर दुसऱ्या बाजूस यवतमाळ जिल्हा असून, मंगरूळ (चव्हाळा) येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे आहे. धानोरा व परिसरातील गावांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना ही नदी पार करावी लागते. मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्याने दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क तुटतो, वाहतूक ठप्प होते आणि शेतकऱ्यांना शेतीची कामे, विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नदीवर पुल बांधावा, असा मुद्दा पाहणीदरम्यान पुढे आला होता. या अडचणीची दखल घेत खासदार काळे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन पुलाची मागणी केली. दुसरीकडे याच तालुक्यातील नागरिकांनी आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत अमरावती-धामक एसटी बसफेरीची मागणी केली.
या मागणीची दखल घेत आमदार प्रताप अडसड यांनी अमरावती आगार व्यवस्थापकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. धामक परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी,नागरिकांना अमरावतीत ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अमरावती–नांदगाव खंडेश्वर– शिवनी– शिंगणापूर–पिंपरी कलगा– येवती– धामक या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली. आमदारांना निवेदन देताना भाजपचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, इतर पदाधिकारी पंकज मेटे, किसान मोर्चा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश सोनकुसरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगोले, संजय गांधी निराधार समिती सदस्य अक्षय मस्के, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रुपेश उघडे उपस्थित होते. धामक ते अमरावती बससेवा सुरू होऊन परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या दूर व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
अशी असावी बसफेरीची वेळ निवेदनाद्वारे सकाळी ८ वाजता, दुपारी ४ वाजता आणि रात्री ७ वाजता, अशा तीन बसफेऱ्या अमरावतीहून सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बससेवेमुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदारांनी संपर्क केल्यानंतर आगार व्यवस्थापकांनी ते मान्य केले आहे.