Headlines

भाजप-आरएसएस बदनामी प्रकरण:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण नागपूर न्यायालयात हजर




काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज नागपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ‘दहशतवादी विचारसरणीशी’ करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आणि तत्कालीन नागपूर शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी हा दावा दाखल केला आहे. हे प्रकरण 2018 मधील आहे, जेव्हा नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली होती. त्यांनी भाजप आणि संघाची विचारसरणी ‘दहशतवादी किंवा उग्रवादी विचारसरणीसारखी’ असल्याचे म्हटले होते. तसेच, हे दोन्ही पक्ष समाजात धार्मिक तेढ आणि द्वेष निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांची सामाजिक मानहानी झाली असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप प्रवीण दटके यांनी केला. त्यानंतर दटके यांनी नागपूरच्या जेएमएफसी न्यायालयात कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीची खाजगी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयाने बजावलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आज न्यायालयात उपस्थिती लावली. त्यांनी आपली बाजू मांडली आणि जामिनाशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण नागपुरातील रवी भवन येथे रवाना झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *