![]()
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉलच्या मुद्यावरून गंभीर आरोप केले आहेत. गडकरींनी जनतेची फसवणूक केली असून, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांमध्ये बिघाड होत असून मायलेजही घटले आहे, असे सरकारने स्वतः कबूल केल्याचे चव्हाण म्हणाले. चव्हाण यांनी स्वतःला विज्ञान आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याचे सांगत तांत्रिक बाबींची माहिती दिली. इथेनॉलचा वापर वाढल्यास पेट्रोलचे दर कमी होतील, असे आश्वासन गडकरींनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात दर कमी न झाल्याने जनतेची फसवणूक झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर बोलताना चव्हाण म्हणाले की, गुप्त भेटी कोणाला कळत नाहीत, पण उघड भेटी सर्वांना दिसतात. सत्ताधारी पक्षातील मित्रांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पवार गट जोपर्यंत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत आहे, तोपर्यंत ते आमचे महत्त्वाचे सहकारी राहतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना चव्हाण यांनी मतदार याद्यांमधील मोठ्या गैरप्रकाराचा आरोप केला. त्यांच्या मतदारसंघात ३ लाख १५ हजार मतदार होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सूचनेनुसार याचिका दाखल केल्यावर एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी नोंदवल्याचे आणि तब्बल पाच मतदारसंघांत समान मतदार असल्याचे समोर आले. अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वी १० टक्के मतदान वाढवण्याचे आव्हान दिले होते, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान वाढू शकत नाही, असे चव्हाण म्हणाले. ४८ हजार नावे वगळण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निवड प्रक्रियेवर आणि पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना नेमके काय आश्वासन दिले होते, ते सरकारने जाहीर करावे अशी मागणी केली. सध्या जरांगे आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुती सरकार शिक्षण आणि आरोग्यावर खर्च न करता केवळ ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना आपण टीईटी परीक्षा सक्तीची केली होती, मात्र सध्याच्या सरकारने शिक्षणाचा बोजवारा उडवला आहे, असेही चव्हाण म्हणाले.
Source link
गडकरींनी जनतेची फसवणूक केली, माफी मागा:इथेनॉलच्या मुद्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा नागपुरात थेट हल्लाबोल