![]()
अमरावती येथे केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार कायद्यांविरोधात कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांनी ‘जेलभरो’ आंदोलन केले. या कायद्यांमुळे शासकीय व कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येऊन केवळ खासगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी ३५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते, मात्र प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात आयटक, सीटू, स्वाभिमानी कामगार संघटनेसह किसान सभा, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आंदोलनाची सुरुवात इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढून झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे, किसान सभेचे अशोक सोनारकर, प्रा. विजय रोडगे, सीटूचे सुभाष पांडे, आयटकचे जे. एम. कोठारी, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे डी. एस. पवार, सुनील मेटकर आणि प्रा. साहेबराव विधळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉम्रेड पवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली, जिथे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांनी ३५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस कवायत मैदानात आणले. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. बांधकाम कामगार संघटनेचे संजय मंडवधरे, शेतमजूर युनियनचे सुनील घटाळे, ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे कॉ. रसुलभाई शहा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
Source link
नव्या कामगार कायद्यांविरोधात अमरावतीत जेलभरो आंदोलन:350 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, नंतर सुटका