![]()
अंजनगाव बारी येथे पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळ चिखलाचे तळे साचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाळेजवळच एक मोठा खड्डा तयार झाला असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. याच मार्गाने दररोज लहान मुले शाळेत जातात. त्यामुळे घसरून पडण्याची किंवा अपघात होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाल्यांची साफसफाई, पाण्याचा निचरा आणि रस्त्यांची दुरुस्ती यावर ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल विचारला जात आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने शाळेजवळील खड्डा बुजवून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोषण पुनिया यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, ग्रामपंचायतीने तातडीने खड्डा बुजवून पाण्याचा निचरा करावा आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थिनींसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याची आणखी एक समस्या समोर आली आहे. पालकांनी शाळेत नवीन वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कुलर तातडीने बसवण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याध्यापिकांमार्फत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. जुनी यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने नवीन यंत्रणा बसवून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापिका विजया झाडे यांनीही या सुविधेची गरज अधोरेखित केली आहे. पालक प्रतिनिधी पंकज दरोळी यांनी ग्रामपंचायतीने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Source link
शाळेजवळ चिखलाचे तळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न:अंजनगाव बारी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह