Headlines

घाटीत एकाच दिवशी दोन देहदान:वर्षभरात एकूण 31 देहदान प्राप्त




शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील शरीररचनाशास्त्र विभागाला सोमवार, १० ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात दोन देहदान प्राप्त झाले. यामुळे या वर्षातील एकूण देहदानांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. कै. आसाराम किसन साळुंके (७९, रा. दुनकी, ता. वैजापूर) आणि कै. इंदुबाई रावण पाटील (७९, रा. गणपूर, ता. चोपडा) यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत देहदानाचा निर्णय घेतला. मातोश्री वृद्धाश्रम तसेच जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या प्रेरणेतून ही दोन्ही देहदाने घडून आली. देहदान चळवळ व्यापक करण्यात सामाजिक संस्थांचा मोठा वाटा असल्याचे विभागाने नमूद केले. विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीने जिवंतपणी देहदानाचा अर्ज भरलेला नसला तरी, त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना देहदान करण्याची इच्छा असल्यास, नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून देहदान करता येते. देहदान पूर्ण झाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना देहदान प्रमाणपत्र व देहदान कार्ड देण्यात येते. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या स्वाक्षरीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. शरीररचनाशास्त्र विभागामध्ये सध्या महिला अधिकाऱ्यांचा पूर्ण स्टाफ असून, त्या देहदानाशी संबंधित संवेदनशील व प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडत आहेत. गरजू नागरिकांना आवश्यक मदत करण्यासाठी विभागातील कर्मचारी सदैव तत्पर असतात. ही संपूर्ण प्रक्रिया घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर-तुंगेनवार यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. आजची दोन्ही देहदाने पूर्णत्वास नेण्यासाठी सहायक प्राध्यापक डॉ. पल्लवी चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले, तर सहयोगी प्राध्यापक डॉ. हिजाब अख्तर यांनी सहकार्य केले. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मिर्झा, विशाल आणि योगेश यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *