![]()
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर, या कायद्यांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात ब्रिटनमधील एका धर्मगुरुसह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध धर्मप्रसाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्मांतरासाठी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मँचेस्टर, ब्रिटन येथील पंकज जेम देवनूर (वय 50) यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामोशी गेट, भवानी पेठ येथील अमित राजू भोसले (वय 31) यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त 7 ते 9 ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ब्रिटनहून धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक विचार मांडण्यात आले. मात्र, या प्रवचनादरम्यान हिंदू देवदेवतांविषयी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत आहे. ‘येशूचे नाव घेतल्याने पाऊस पडतो तसेच आजार बरे होतात,’ अशा स्वरूपाची वक्तव्ये करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यात आले. तसेच नागरिकांना धर्मांतरासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित धर्मगुरूविरुद्ध परदेशी नागरिक कायदा आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवीन कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याअंतर्गत राज्यातील हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे करत आहेत. कार्यक्रमातील वक्तव्ये, आयोजकांची भूमिका आणि धर्मांतराचा कथित प्रयत्न याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
Source link
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पुण्यात पहिली कारवाई:धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा दाखल