Headlines

तिरंग्याचा मान-सन्मान कधीही झुकू देणार नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात निर्धार




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात आयोजित भव्य ‘तिरंगा यात्रे’त सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘तिरंग्याचा मान-सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान कधीही झुकू देणार नाही,’ असा ठाम निर्धार व्यक्त केला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी तिरंगा हाती घेतल्याचे सांगत, त्यांनी राज्यघटनेतील अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे स्मरण ठेवण्याचे आवाहनही केले. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी तिरंगा गौरव समितीतर्फे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील ललित महल हॉटेलपासून छत्रपती संभाजी महाराज उद्यानापर्यंत ही यात्रा उत्साहात काढण्यात आली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (एफ.सी. रोड) तिरंग्याचा महापूर पाहायला मिळाला. या यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह अनेक आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि पुणेकर युवा देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ते १५ ऑगस्ट या काळात राष्ट्रभक्ती प्रकट करण्यासाठी प्रत्येकाने तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर येण्याचे आवाहन केले आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी ‘करो या मरो’चा नारा देत ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले होते, ज्या क्रांतीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला तिरंगा फडकला. मुख्यमंत्री म्हणाले की, ही आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यभूमी आहे. जोपर्यंत या भूमीत छत्रपतींचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा अभिमानाने फडकत राहील. मुख्यमंत्र्यांनी तिरंगा हाती घेताना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून त्या पूर्ण करण्याचे आवाहन केले. विकसित भारताच्या स्वप्नासोबतच पुढील २० वर्षांत सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. क्रांतिकारकांचे बलिदान आणि सीमांवर शत्रूंना धूळ चारणाऱ्या सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांनी पुण्याच्या युवा शक्तीचे कौतुक केले. पुणे ही विद्यानगरी आणि इनोव्हेशन नगरी असून, या तरुणांच्या बळावरच उद्याचा बलशाली भारत उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांनी ‘अभी भारत ने नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी खुला आसमान बाकी है…’ या ओळींच्या माध्यमातून संपूर्ण आसमंतात तिरंगा फडकवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *