![]()
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी योगदान, राष्ट्रनिर्माणाचे कार्य आणि समाजजागृतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमच्या केंद्रीय प्रचार विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या क्रांतीज्योत यात्रेला क्रांतीदिनानिमित्त उत्साहात प्रारंभ झाला. ९ ते ३१ ऑगस्टदरम्यान ही यात्रा संपूर्ण विदर्भातील विविध जिल्हे व गावांमध्ये मार्गक्रमण करीत राष्ट्रभक्ती, ग्रामविकास, सामाजिक समता, स्वावलंबन आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणार आहे. क्रांतीदिनाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळी आरती व पूजन करून क्रांतीज्योतीचे विधिवत प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ही ज्योत राष्ट्रसंतांच्या जन्मभूमी असलेल्या यावली शहीद येथे नेण्यात आली. जन्मस्थान स्मृती मंदिर समिती, शहीद स्मारक समिती आणि श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे क्रांतीज्योतीचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंतांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करत शहीदांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेले राष्ट्रप्रेम, ग्रामविकास, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला जाणार आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचा ‘शाखा तेथे वृक्षारोपण’ हा उपक्रमही यात्रेशी जोडण्यात आला असून, ज्या-ज्या गावांमध्ये क्रांतीज्योत पोहोचेल तेथे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू, सरचिटणीस जनार्दन बोथे, कार्यकारिणी सदस्य दामोदर पाटील, आध्यात्म विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे, रामदास देशमुख, विठ्ठल सावरकर यांच्यासह गुरुदेवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
क्रांतीदिनी गुरुकुंजातून पेटली क्रांतीज्योत; आरती, पूजन केले:31 ऑगस्टपर्यत विदर्भभर घुमणार राष्ट्रसंतांच्या विचारांचा संदेश