![]()
ऑरिकने बिडकीनमध्ये विस्तार करण्यासाठी ३२०० हेक्टर जमिनीची सरकारकडे मागणी केल्यानंतर आता त्यालगतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) नव्या औद्योगिक वसाहतीसाठी २ हजार हेक्टरची जागा मागितली आहे. गेल्या महिनाभरात ५ मोठ्या कंपन्यांनी भूखंडांसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीने जागेच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. प्रस्तावित वसाहतीसाठी सरकारने जमिनी दिल्यास ही शहर-परिसरातील नववी एमआयडीसी ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयडीसीने भेंडाळा येथील शेती शाळेच्या जमिनीची पाहणी केली. ३५५ हेक्टर जमीन संपादनासाठी निश्चित केली आहे. ही जागाही एमआयडीसीला पुरेशी ठरणार नाही. त्याचबरोबर प्रमुख उद्योग समूहांनी एमआयडीसीकडे जागेसाठी थेट मागणी नोंदवली असल्याने उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन विस्ताराची पावले वेगाने उचलली जात आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्मिती उद्योगाकडूनही जागेसाठी विचारणा शहर परिसरामध्ये टोयोटा, एथर, जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या उद्योगांची गुंतवणूक झाल्यामुळे शहरात आणखी ५ जगप्रसिद्ध उद्योगांना जमीन हवी आहे. यासाठी एमआयडीसी, तसेच ऑरिकच्या अधिकाऱ्यांची उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन उद्योग सुरू करण्यासाठी जमिनीसंबंधी विचारणा केली आहे. या पाच उद्योगांमध्ये एका जगप्रसिद्ध वाहन निर्मिती कंपनीचाही समावेश आहे. दरम्यान, एमआयडीसीकडे जयपूर (विस्तारित शेंद्रा) येथे १५० एकर जमिनीसाठी महिंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. विशेष म्हणजे बिडकीन परिसरातील जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी राखीव आहेत. आॅरिकने याच जमिनीची मागणी केली आहे. त्याचबरोबर आता एमआयडीसीलाही याच लगतची जमीन हवी आहे. जमीन अधिसूचित असल्यामुळे संपादनाची प्रक्रिया तुलनेत वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सुविधांमुळे संभाजीनगरला पसंती छत्रपती संभाजीनगर शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता आहे. राज्यातील अन्य मोठ्या शहरांच्या तुलनेत या जमिनी स्वस्त आहेत. त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पातून उद्योगांची पाण्याची गरज भागवणे शक्य आहे. संभाजीनगरमध्ये मनुष्यबळाची उपलब्धताही अन्य शहरांच्या तुलनेत स्वस्तात होते. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग, धुळे-सोलापूर हायवे, प्रस्तावित शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव हा पुणे राज्य मार्गाला जोडणारा रस्ता, त्यासोबत रेल्वे आणि विमानाची कनेक्टिव्हिटी, विमानतळाचा प्रस्तावित विस्तार यांमुळे दळणवळणाचे मजबूत जाळे उपलब्ध आहे. भविष्यात दळणवळण मजबूत होणार आहे. त्यासोबतच निवासी वापरासाठी भूखंडांची उपलब्धता आदींमुळे छत्रपती संभाजीनगर शहर व परिसराला उद्योगांच्या उभारणीसाठी प्राधान्य असल्याचे मानले जाते.
Source link
बिडकीनमध्ये ऑरिकशेजारीच एमआयडीसीला हवी 2 हजार हेक्टर जागा:5 मोठ्या उद्योगांकडून जमिनीसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीचा सरकारकडे प्रस्ताव