Headlines

मुंबईत ड्रग्ज विकताना पोलिसाला रंगेहाथ अटक!:जोगेश्वरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला 5 ग्रॅम 'एमडी'सह ठोकल्या बेड्या




देशातील सर्वात कार्यक्षम आणि नावाजलेल्या पोलिस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लावणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात मालवणी पोलिसांनी धडक कारवाई करत, मुंबई पोलिस दलातील किरण इंदुलकर या कॉन्स्टेबलला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात किरण इंदुलकर याला 5 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) म्हणजेच ‘म्याव-म्याव’ या अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेला कॉन्स्टेबल किरण इंदुलकर हा सध्या जोगेश्वरी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नियुक्ती मालवणी पोलिस ठाण्यात होती. मालवणीत कार्यरत असतानाच तो अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांच्या संपर्कात आला आणि त्याला परिसरातील ड्रग्ज नेटवर्कची संपूर्ण माहिती मिळाली, असा पोलिसांचा संशय आहे. ड्रग्ज माफियांसोबत असलेल्या या संबंधांमुळे आणि त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तो आधीपासूनच संबंधित तपास यंत्रणांच्या रडारवर होता. पूर्वीच्या तक्रारी आणि निलंबनाची कारवाई मूळचा बीडीडी चाळ, नायगाव येथील रहिवासी असलेल्या किरण इंदुलकर याच्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी वरिष्ठांकडे आल्या होत्या. त्याच्या याच वादग्रस्त वर्तणुकीची दखल घेत, दोन वर्षांपूर्वी त्याला कडक ताकीद देऊन त्याची मालवणी पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली होती. एवढेच नाही, तर यापूर्वी त्याला सेवेतून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्या वर्तणुकीत कोणताही सुधार झाला नसल्याचे या ताज्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलिस कोठडी आणि प्रतिमेवर प्रश्नचिन्ह अमली पदार्थ विक्रीप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या इंदुलकरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या मालवणी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी कोणाचे धागेदोरे जुळले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचाच अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळल्याने मुंबई पोलिस दलाची प्रतिमा काळवंडली असून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ अटक मालवणी परिसरातील गेट क्रमांक 8 जवळ अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्याठिकाणी एक बनावट विक्रेता उभा करून सापळा रचला होता. काही वेळातच किरण इंदुलकर तिथे आला आणि त्याने 15 हजार रुपयांना चार ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्जची खरेदी केली. हा व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ रंगेहाथ बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, सुरुवातीला अटक करण्यात आलेला आरोपी नेमका कोण आहे याची पोलिसांनाही अजिबात कल्पना नव्हती, मात्र नंतर तपासादरम्यान तो चक्क मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल असल्याचे निष्पन्न झाल्याने हा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *