Headlines

महिला आरक्षण विधेयक कोसळलं:नवनीत राणांचा भावनिक उद्रेक, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला; सपकाळ-पवारांचीही टीका




देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच तापले आहे. विधेयक फेटाळल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विरोधकांनी हे विधेयक जाणीवपूर्वक रोखले, असा आरोप त्यांनी केला. हा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. महिलांना न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण आम्ही त्यांना पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही, यासाठी आम्ही त्यांची माफी मागतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच विरोधकांना महिलांकडून कधीच माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारचा डाव उधळून लावला – हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या निकालाचे वेगळेच विश्लेषण केले. त्यांच्या मते, हा लोकशाहीचा विजय आहे. इंडिया आघाडीने सरकारचा डाव उधळून लावला असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, अशी टीका त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत. प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता – रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचा महिला आरक्षणाला विरोध नव्हता, मात्र मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेला विरोध होता. जनगणना न करता हा निर्णय घेतला असता, तर अनेकांवर अन्याय झाला असता, असे त्यांनी नमूद केले. काही राज्यांमध्ये या प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय षडयंत्र होते – संजय राऊत याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते आणि ते आता कोसळले आहे. सत्ताधाऱ्यांनी मतदारसंघांची फेररचना करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणातून सरकारचे खरे स्वरूप समोर आले असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार अल्प बहुमतावर, कधीही कोसळू शकते संजय राऊत यांनी पुढे पंतप्रधानांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, सध्याचे सरकार अल्प बहुमतावर टिकले आहे आणि ते कधीही कोसळू शकते. फक्त काही खासदारांच्या आधारावर सत्ता टिकली आहे. परिस्थिती बदलली, तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा आता केवळ विधेयकापुरता मर्यादित न राहता मोठ्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *