Headlines

अशोकराव खाल्लेल्या मीठाला जागायला शिका:पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, महाराष्ट्र काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर हल्ला




महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नांत अडसर आणला गेला, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचा चव्हाणांना पाठीचा कणा मजबूत ठेवण्याचा सल्ला काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटले की, अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम – 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं व नंतर 50% आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाली वाचा काय म्हणाले होते अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले होते, नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या 2029 च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट 50 टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *