Headlines

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी




१९६७ सालची गोष्ट… लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच नाही. आज ५९ वर्षांनंतर या शाळेची अवस्था अशी आहे की, पूर्ण तांड्यातून फक्त आर्यन नावाचा एकुलता एक विद्यार्थी पहिल्या वर्गात बसतो आणि शिक्षक केवळ त्यालाच शिकवण्यासाठी रोज डोंगर-दऱ्या पार करून येतात. ही कथा फक्त एका शाळेची नाही, तर व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या एका गावाची आहे. शहरापासून लामकाना तांडा केवळ ३२ ते ३५ किमीवर आहे. मुख्य रस्ता संपल्यावर दोन किलोमीटरची नुसती खडबडीत पायवाट सुरू झाली. पुढे गेल्यावर एक सुकलेलं तळं लागलं. सुदैवाने पाणी कमी असल्याने तळ्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचलो. आजूबाजूला घनदाट डोंगर आणि एका उंच टेकडीवर ही शाळा. वर्गात डोकावून पाहिलं तर एका रिकाम्या बाकावर चिमुकला आर्यन एकटाच बसला होता आणि शिक्षक त्याला धडे गिरवायला लावत होते. हे दृश्य मनाला चटका लावून जाणारं होतं. विचारपूस केल्यावर समजलं की रस्ता आणि पाण्याअभावी २५० घरांचा हा तांडा आता जेमतेम ५० घरांवर येऊन ठेपला आहे. या स्थलांतराचा शाळेच्या पटसंखेवर परिणाम झाला आहे. ‘मी पहिलीत शिकतो, वर्गात मित्रच नाहीत!’ “मी पहिल्या वर्गात शिकतोय. वर्गात शिकताना मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं, खेळायला जावंसं वाटतं, पण माझ्या वर्गात कुणीच मित्र नाही” – आर्यन राठोड, विद्यार्थी. आधी रस्ता तर द्या, मुलं शाळेत येतील “इथूनच शिकून मुलं पोलिस, आर्मीत लागली. आम्ही मजुरी करून मुलांना शिकवू, पण गावात रस्ता आणि सुविधा तर मिळाली पाहिजे. – रामसिंग राठोड, माजी विद्यार्थी. मुलांना आणण्याचा प्रयत्न करणार ग्रामस्थांशी संवाद साधून पटसंख्या वाढवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास स्वतःचे वाहन लावून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. – ज्ञानेश्वर पठाडे, शिक्षक स्थलांतराचा फटका शिक्षणाला या बातमीचा सर्वात मोठा पैलू हा आहे की, ही शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अनास्थेमुळे ओस पडलेली नाही तर ‘प्रशासकीय सुस्ती’मुळे पडली आहे. राज्यभरात कमी पटाच्या ८०० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लामकाना तांड्याची शाळाही त्याच उंबरठ्यावर आहे. डोंगराळ भाग, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाण्यासाठी साधा रस्ता नाही. त्यामुळे येथील ऊसतोड कामगार आणि मजुरांनी दुसऱ्या गावात स्थलांतर केले आहे. परिणामी, गेल्या वर्षी ६ असलेली विद्यार्थी संख्या या वर्षी थेट एकवर आली आहे. अधिकाऱ्यांच्या वाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील उणिवा इथे स्पष्ट दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. कोणत्याही ठोस सुविधा दिल्या जात नाहीत. गावात साधा दवाखाना नाही. जर ही शाळा बंद पडली तर तांड्यावरील उरल्यासुरल्या लेकरांना शिक्षणासाठी तब्बल ४ किलोमीटर पायपीट करावी लागेल, जी लहान मुलांसाठी शक्य नाही.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *