Headlines

गणेशोत्सवात चोरी करणारे तिघे हरियाणातून अटक:पोलिसांनी 4600 किमी पाठलाग करत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला




गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास पथकाने चार हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला अशी माहिती परिमंडळ एक ते पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी हरियाणातील पलवल येथील असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कराळे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने आरोपींच्या ठावठिकाण्याचा शोध सुरू केला. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलीस ठाण्यात अटकेत असल्याची माहिती पथकाला मिळाली. अरवली पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलिसांनी तपासाची पुढील दिशा निश्चित केली. त्यानंतर हरियाणातील पलवल येथे जाऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले. अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय, २० वर्षे, रा. समसाबाद पलवल, राज्य हरियाणा) ,अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी, (वय २४ वर्षे, रा. आदर्श कॉलनी पलवल राज्य हरियाणा) ,दिपक समशेर राजुभाई सापसिंग (वय २१ वर्षे रा. हिरानगर कॉलनी पलवल राज्य हरियाणा) याआरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर संबंधित गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस कोठडीदरम्यान अधिक तपास करण्यात आला. या चौकशीत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी चोऱ्या केल्याचे समोर आले. अशा एकूण नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींकडून नऊ गुन्ह्यांतील सुमारे १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्हे करण्यासाठी येण्याकरिता आणि जाण्याकरिता वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली. या मोटारीची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. त्यामुळे कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत जवळपास २३ लाख रुपये झाली आहे. या कारवाईसाठी गुजरातमधील अरवली आणि हरियाणातील पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली. गर्दीतील चोरीच्या घटनांचा तपास करताना आरोपींची ओळख, त्यांचा पत्ता आणि गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *