![]()
महान ते पातूर या २८ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गावरील लोहगड, धाबा, जनुना, राजनखेड, शेलगावसह अनेक खेड्यांतील नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, महान येथील हनुमान मंदिरासमोरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पूल खचल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण करण्यात आले, परंतू पुलाची साधी डागडुजीही न केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर पुलाजवळ पातूर, महान, मत्स्य बीज केंद्र आणि अकोला या चारही दिशांना जाणारे वळण आहे. पुलाला पुरेशी उंची नसून, रस्ता व पूल एकाच पातळीवर असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यातच महान जलशुद्धीकरण केंद्रातील सांडपाणी याच नाल्यातून वाहत असल्याने पुलाजवळ सतत पाणी साचलेले असते. पुलाला लागूनच हनुमान मंदिर असल्याने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. खचलेला पूल आणि त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. महान ते पातूर या मार्गावरील पुल आणि रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून लोहगड, धाबा, जनुना, राजनखेड, शेलगावसह अनेक खेड्यांतील नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. ^शेतीमाल, बँक, रुग्णालय व विविध कामांसाठी आम्हाला दररोज महान येथे यावे लागते. मात्र, हनुमान मंदिरासमोरील खचलेला पूल आणि खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना अपघाताची भीती वाटते. पुलाखालून सतत पाणी वाहत असल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे. बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढवून तत्काळ डागडुजी करावी. – गणेश श्रीराम लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते, हलदोली. २८ किमीच्या प्रवासाला लागतोय १ तास अमरावती-पातूर बससह परिसरातील जांभरूण, कोथळी, हलदोली, वरखेड, धानोरा, किनखेड आदी गावांतील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांनी याच मार्गाने प्रवास करतात. रस्ता अत्यंत अरुंद असून दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे-झुडपे आणि खड्ड्यांमुळे अवघ्या २८ किलोमीटरच्या अंतरासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हनुमान मंदिरासमोरील पुलाची उंची वाढवावी व रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुलावरील मुख्य अडचणी व धोके अपुऱ्या उंचीमुळे अडचण: रस्ता आणि पुलाची पातळी एकसमान असल्याने वाहनांना साइड देणे कठीण. अतिधोकादायक वळण: पातूर, महान, अकोला व मत्स्य बीज केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांचे पुलाजवळच संगम वळण. सांडपाण्याचा प्रवाह: जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी सतत वाहत असल्याने रस्त्याची चाळणी व दलदल. अरुंद रस्ता व झुडपे: रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका आहे.
Source link
महान ते पातूर मार्गावरील पूल खचला; वाढला अपघाताचा धोका:चारही बाजूंना धोकादायक वळण अन् पाणी साचल्याने वाढला धोका