![]()
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी निलंगा शहरात महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज आणि वाहनांवर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता निलंगा तहसील कार्यालयाच्या परिसरातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तिरंगा ध्वज घेऊन दुचाकींवर सहभागी झाले होते. रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लांबोटा येथील वन परीक्षेत्र गाठले. यावेळी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महसूल विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. दरम्यान, लांबोटा येथील वन परीक्षेत्र परिसरात रॅली पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. ‘हर घर तिरंगा’चा घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्याबरोबरच देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
Source link
निलंगा:निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा