![]()
कौटुंबिक वादातून आणि पत्नीला परत न पाठवल्याच्या रागातून सासरच्या घरी जाऊन सासऱ्याचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या जावयाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. शहरातील महात्मा फुले नगरातील विशाल सदाशिव गवई याचे लग्न शेजारीच राहणारे दिलीप सावंग यांची मुलगी किरण हिच्याशी झाले होते. लग्नानंतर होणाऱ्या सततच्या वादाला व मारहाणीला कंटाळून किरण माहेरी निघून गेली होती. ९ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विशाल सासरी पोहोचला. पत्नीला सासरी पाठवण्याच्या कारणातून त्याने सासू व पत्नीला मारहाण सुरू केली. यावेळी सासरे दिलीप सावंग यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त विशालने त्यांची छाती व पोटावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नऊ साक्षीदारांचे जबाब व ठोस पुराव्यांच्या आधारे अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विशाल गवई याला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. ती हायकोर्टात कायम राहिली. नातेवाइक असल्याने साक्ष अवैध ठरत नाही आरोपीने हायकोर्टात शिक्षेला आव्हान देत साक्षीदार हे मृताचे नातेवाइक असल्याचा आक्षेप घेतला होता. हायकोर्टाने हा युक्तिवाद फेटाळत शिक्षा कायम ठेवली. सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. एस. एस. डोईफोडे यांनी तर सत्र न्यायालयात ॲड. शाम खोटरे यांनी बाजू मांडली होती.
Source link
अकोला:सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची जन्मठेप कायम