Headlines

हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्या, गुणरत्न सदावर्तेंची मागणी:म्हणाले- प्रताप सरनाईक रिक्षावाल्यांकडून खंडणी वसूल करत आहेत, जरांगेंवरही हल्लाबोल




स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भाषा, संविधान, रिक्षाचालकांचे प्रश्न, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर केलेले आरोप आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेसह विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेले राजकारण थांबवण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. तसेच रिक्षाचालकांकडून कथितरीत्या पैसे गोळा करण्याच्या मुद्द्यावरून प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवरही तीव्र आक्षेप घेतले. जरांगे यांच्या भाषेमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणावर डाग पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच धमकीची भाषा आणि शिवराळ वक्तव्यांना राजकीय पाठिंबा मिळता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्ही आधी देशवासी, जात-धर्म नंतर पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच सदावर्ते यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. भारताच्या संविधानाने सर्वांच्या हिताची आणि अधिकारांची काळजी घेतली असून संविधानाचे संरक्षण झाले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विविध समाजघटकांतील प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगत त्यांनी, “आम्ही कोणती जात किंवा धर्म म्हणून नाही, तर देशवासी म्हणून एकत्र आलो आहोत,” अशी भूमिका मांडली. देशाच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात प्रवेश करत असताना संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी कायदा करा भाषेच्या मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी संसदेत कायदा आणण्याची मागणी केली. जगभरातील विविध देशांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. स्थानिक भाषांचा तिरस्कार करण्याचा आपला हेतू नसला तरी देशाची जागतिक ओळख मजबूत करण्यासाठी एका भाषेचा व्यापक वापर असावा, असे ते म्हणाले. संसदेत हिंदी आणि इंग्रजीसह संविधानाने परवानगी दिलेल्या इतर भारतीय भाषांचा वापर करता येतो, याचा उल्लेख करत त्यांनी हिंदीबाबत स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाषेच्या नावावर महाराष्ट्रात राजकारण थांबवा महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून सामान्य नागरिकांना त्रास होईल, अशा प्रकारचे राजकारण होऊ नये, असे सदावर्ते म्हणाले. रिक्षाचालक, कामगार आणि इतर कष्टकरी वर्गाला भाषेच्या आधारावर त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगान कोणत्याही एका राज्याच्या भाषेपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते. देशाच्या विविध भागांतून येणारे नागरिक एकत्र राष्ट्रगान गातात, यातच राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती किंवा देशातील इतर उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती हे वेगवेगळ्या राज्यांतून येऊ शकतात. त्यामुळे एखाद्या पदासाठी केवळ एका विशिष्ट भाषेची सक्ती करता येईल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रताप सरनाईकांवर रिक्षाचालकांच्या पैशांवरून गंभीर आरोप रिक्षाचालकांच्या प्रश्नावरून सदावर्ते यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालकांकडून पैसे जमा करण्यास सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांकडून याबाबत विचारणा केली असता “वरून आदेश आहेत” असे सांगितले जात असल्याचा दावा त्यांनी केला. हे आदेश नेमके कोणाचे आहेत, याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. रिक्षाचालकांकडून घेतलेले पैसे परत करावेत आणि ही प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. रिक्षाचालकांवर दबाव आणणे, वाहनांच्या परवान्यांबाबत कारवाईची भीती दाखवणे किंवा वाहन चालवण्यास अडथळे निर्माण करणे अशा प्रकारचे प्रकार होत असतील तर ते गंभीर असल्याचे सदावर्ते म्हणाले. अशा प्रकारच्या कथित दबावाच्या कारवाईला भारतीय न्याय संहितेतील विविध तरतुदी लागू होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. तसेच मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांच्या चौकटीतही अशा प्रकारच्या कारवाईचे परीक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांवर कोणतीही सक्ती किंवा दडपशाहीची कारवाई करू नये, असे आवाहन सदावर्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केले. “उद्या हर्षाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. अशा दिवशी कोणत्याही रिक्षाचालकाला हात लावता कामा नये,” अशी मागणी त्यांनी केली. भाषेच्या नावाखाली मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला त्रास देणे हा स्वातंत्र्याच्या मूलभूत भावनेलाच विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले. मनोज जरांगेंवर सदावर्तेंचा हल्लाबोल पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवरही सदावर्ते यांनी टीका केली. जरांगे यांच्या काही वक्तव्यांमध्ये शिवराळ आणि धमकीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणावर अशी भाषा डाग आहे,” असे म्हणत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला. विशेषतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने धमकीची भाषा वापरू नये आणि कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे ते म्हणाले. जरांगे यांना माफ करण्याचा अधिकार कोणी दिला? मनोज जरांगे यांच्या काही वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी प्रश्न उपस्थित केला की, एखाद्याला माफ करण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा आंदोलनकर्त्याला स्वतःहून मिळत नाही. देशात संविधान, न्यायव्यवस्था आणि कायदा आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीबाहेर कोणीही स्वतःला अंतिम प्राधिकारी समजू नये, असे त्यांनी म्हटले. जरांगे यांच्या काही वक्तव्यांना सत्ताधारी नेत्यांकडून मवाळ प्रतिक्रिया दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. धमकीची भाषा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राजकीय संरक्षण मिळता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सदावर्ते यांनी मोठा दावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले आरक्षण घटनात्मक कसोटीवर टिकणार नसल्याचे त्यांनी म्हटले. “संविधानाचा विद्यार्थी म्हणून मला वाटते की डिसेंबरनंतर हे आरक्षण टिकणार नाही,” असा दावा त्यांनी केला. हा त्यांचा कायदेशीर आणि घटनात्मक आकलनावर आधारित दावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… स्वातंत्र्यदिनाचा उत्साह:मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *