![]()
श्री गजानन महाराजांचे शिष्य श्री संत भास्कर महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे राजेश्वर नगरीत भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त अकोली जहाँगीर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेली ही पालखी श्री विठ्ठल- रखुमाईचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली असता अकोला शहरात ठिकठिकाणी भाविकांनी तिचे स्वागत केले. पालखीचे सिंधी कॅम्प परिसरात संध्याकाळी आगमन झाले. यावेळी प्रमोद ठाकरे यांनी पालखीचे स्वागत करून वारकरी व भाविकांसाठी रात्रीच्या मुक्कामाची तसेच महाप्रसादाची व्यवस्था केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीचे गुप्ते मार्गावरील वामनराव फुंडकर यांच्या निवासस्थानी आगमन झाले. येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. आरतीनंतर उपस्थित भाविक व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्री संत भास्कर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पालखी पुढील प्रवासासाठी अकोली जहाँगीरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अकोला शहरातील विविध चौकांमध्ये भाविकांनी रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतषबाजी करून तसेच पुष्पवृष्टी करीत पालखीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी चहा, नाश्ता व फराळाचे वाटप करून वारकरी आणि भक्तांची सेवा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मार्गावर भक्ती, नामस्मरण आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा पवित्र पालखी सोहळा अशोक महाराज जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी मोहन महाराज, रवी महाराज, धनंजय महाराज, ज्ञानू महाराज, शिवा महाराज, गौरव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, रवींद्र महाराज उपस्थित होते. शहरात वामनराव फुंडकर परिवाराच्या वतीने पालखीतील वारकरी व भाविकांसाठी स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. स्वागतासोबतच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याने भक्तीबरोबरच सेवाभावाचेही दर्शन घडले. श्री संत भास्कर महाराजांच्या पालखीचे हे स्वागत म्हणजे केवळ धार्मिक परंपरेचे पालन नव्हे, तर ‘सेवा हीच साधना आणि भक्ती हीच जीवनाची शक्ती’ या भावनेचा सुंदर आविष्कार ठरला. पालखीच्या आगमनाने राजराजेश्वर नगरीतील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
Source link
टाळमृदंगाचा गजर:राजराजेश्वर नगरीत श्री संत भास्कर महाराज पालखीचे उत्साहात स्वागत