Headlines

बीडमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र:धनंजय मुंडेंची भावनिक मागणी, पंकजांचा लगेच निर्णय अन् सुनेत्रा पवारांचं मोठं आश्वासन




राज्याचे कृषी व पशुधन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, बीड जिल्ह्यातील परळी येथे आज पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला आणि भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात पार पडला. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, या सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे बंधू-भगिनी एकत्र उपस्थित होते. याच कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी दोन मोठ्या मागण्या केल्या, ज्यापैकी एक पंकजा मुंडे यांनी लगेच मान्य केली, तर दुसऱ्या मागणीसाठी सुनेत्रा पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. धनंजय मुंडेंच्या दोन प्रमुख मागण्या आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान दोन महत्त्वपूर्ण मागण्या राज्य सरकारसमोर ठेवल्या. 1. बारामती पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांचे नाव: बारामती येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. 2. परळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला गोपीनाथ मुंडेंचे नाव: परळीत भूमिपूजन झालेल्या या नव्या महाविद्यालयाला दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे, असा आग्रह त्यांनी धरला. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “हा भाग आता कृषी आणि पशुधनाचा लँडमार्क ठरणार आहे. वैजनाथच्या सानिध्यात पशुवैद्यकीय आणि सोमेश्वराच्या सानिध्यात कृषी महाविद्यालय होत आहे. आज आम्ही सरकारकडे इतर काही मागणार नाही, पण ज्या परिस्थितीत तुम्ही (सुनेत्रा पवार) राज्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्यात आम्ही सर्व ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत.” पंकजा मुंडेंची तातडीची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री या नात्याने पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात मोठी घोषणा केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या पहिल्या मागणीची दखल घेत, “बारामतीच्या पशुवैद्यकीय कॉलेजला दिवंगत अजितदादा पवार यांचेच नाव दिले जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी आपल्या भाषणातून केली. सुनेत्रा पवार भावुक; गोपीनाथ मुंडेंच्या नावासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. “अजितदादा घोषणा करत नव्हते, तर ते प्रत्यक्षात उतरवत होते. त्यांनी घोषणेनंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्य मंत्रिमंडळात या दोन्ही कॉलेजेसला मंजुरी दिली होती. दादांनी ही जणू बहिणीला दिलेली भेटच होती,” अशा शब्दांत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. अजितदादांनी बीडच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या मागणीबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी ग्वाही दिली की, “आमदार धनंजय मुंडेंनी परळीच्या महाविद्यालयासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा जो आग्रह धरला आहे, तो मी नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन.” तसेच, या महाविद्यालयामुळे नोकरी मागणारा नव्हे, तर स्टार्टअप (Startup) सुरू करणारा युवक घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैजनाथ मंदिरात महाआरती आणि दर्शन या अत्यंत महत्त्वाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैजनाथ मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी तिथे रुद्राभिषेक आणि महाआरतीही केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. या विकासकामांमुळे परळी आणि परिसराला एक नवी शैक्षणिक व पायाभूत ओळख मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हेही वाचा… ‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’: सोनिया गांधींचीही परवानगी होती, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; नेमके काय म्हणाले? सध्या राज्यात आणि देशात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असून सत्तेसाठी अनेक नेते व पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. ज्याचा प्रत्यय नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेल्या प्रवेशावरून आला. राजकारणातील याच बदलत्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या चर्चांदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि त्याबाबतचे सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा हा पक्षप्रवेश का रद्द झाला, यामागची पडद्यामागची माहिती चव्हाण यांनी आता उघड केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *