![]()
केंद्र सरकारने नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशभरातील ओबीसी नेत्यांकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत सामाजिक न्यायाच्या लढ्याला हे ऐतिहासिक यश आल्याचे म्हटले आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, पूर्वी जनगणनेत जात हा विषय नव्हता, मात्र आता जातनिहाय जनगणनेचा विषय मंजूर झाल्यामुळे एका कमांडवर देशभरातील ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या हातात येणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, 2011 च्या जनगणनेत जातीचा रकाना नव्हता, मात्र आता तो समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या जातनिहाय जनगणनेसाठी आपण गेली 20 वर्षे सातत्याने आवाज उठवला असून, याच मागणीसाठी 2010 मध्ये समता परिषदेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, अशी आठवण भुजबळ यांनी यावेळी सांगितली. हरिभाऊ राठोड यांचा भुजबळांवर निशाणा भुजबळांच्या या दाव्यांवर ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राठोड यांनी आरोप केला आहे की, जातिगत जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटे बोलत आहेत. 2011 ची जनगणना झाली तेव्हा जनगणनेत जातीचे कॉलम होते. तसेच, ग्रामीण विभागाकडून झालेल्या जनगणनेसाठी पूर्ण देशामध्ये 20 हजार कोटी रुपये खर्च झाल्याची कबुली स्वतः केंद्र सरकारने लोकसभेत दिली होती. त्यावेळी जनगणनेचा डाटा काही तांत्रिक कारणांमुळे व्यवस्थित जमा न झाल्याचे सांगून, तत्कालीन सरकारने एस.सी. आणि एस.टी. वगळून इतर जातींची आकडेवारी सार्वजनिक करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. असे वास्तव असताना भुजबळ 2011 मध्ये जातीचा कॉलम नव्हता असे कसे काय सांगत आहेत? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला आहे. ‘ओबीसींची फसवणूक थांबवा, अन्यथा भाजपला घरी पाठवू’ हरिभाऊ राठोड यांनी पुढे टीका करताना म्हटले आहे की, छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते असूनही ते आता पूर्णपणे भाजपकडे झुकल्याचे दिसत आहेत. यापूर्वीही त्यांच्या मंत्रिमंडळात एस.ई.बी.सी. असा कोणताही प्रयोग नसताना कायद्याद्वारे मराठा समाजाला ओबीसी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी ओबीसींचे मोठे नुकसान केले आहे. 2011 मध्ये जनतेची जी फसवणूक झाली, तीच फसवणूक विद्यमान सरकारही करत असल्याचा आरोप राठोड यांनी केला. सरकारने ओबीसींची वारंवार फसवणूक करणे थांबवावे, अन्यथा एक दिवस ओबीसी समाज नक्कीच जागा होईल आणि भाजपला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. भुजबळांकडून पंतप्रधानांचे आभार या सर्व घडामोडींवर छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले आहेत. समता परिषदेच्या स्थापनेपासून जिथे जिथे ओबीसी मेळावे झाले, तिथे आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाला काही देण्याची वेळ येते, तेव्हा कोणीतरी न्यायालयात जाते आणि मग न्यायालय ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न विचारते. 1931 साली झालेल्या जनगणनेनुसार ती 54 टक्के नोंदवली गेली होती, मात्र न्यायालय नेहमी सद्यस्थितीतील लोकसंख्या विचारत असते. त्यामुळेच आमची ही मागणी सातत्याने होती आणि आता प्रत्यक्ष जातनिहाय जनगणना होत असल्याने ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. ही देखील बातमी वाचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक:म्हणाले- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास मूळ ओबीसी शिल्लकच राहणार नाही राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली आहे. तसेच, “येत्या १ सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत धडकणार असून, सरकारला ओबीसींची ताकद आणि वज्रमूठ दाखवून देऊ,” अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. इथे सविस्तर बातमी वाचा
Source link
"ओबीसींची फसवणूक थांबवा, अन्यथा भाजपला घरी पाठवू":छगन भुजबळ पूर्णपणे भाजपकडे झुकलेले; हरिभाऊ राठोड यांची टीका