![]()
विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दिवसभरात आत्मदहनाचा प्रयत्न, उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलन झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वारसाहक्काच्या नोकरीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न जावली तालुक्यातील सोमर्डी येथील विष्णू पांडुरंग आवळे यांनी त्यांचा मुलगा ऋतिक विष्णू आवळे याला लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने शासकीय नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 लाखांच्या व्यवहारातून फसवणूक केल्याचा आरोप जावली तालुक्यातील खिलारमुला येथील विठ्ठल भागू ढेबे, रमेश विठ्ठल ढेबे आणि संगिता विठ्ठल ढेबे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. भोगवली गावातील वडिलोपार्जित ८२ गुंठे जागेवर कौटुंबिक अडचणीमुळे १७ लाख रुपये तीन टक्के मासिक व्याजदराने घेतल्याचा त्यांचा दावा आहे. या व्यवहारात चेतन चंद्रशेखर पाटील, रूपाली ठोंबरे पाटील आणि भक्ती चेतन पाटील यांनी कुलमुखत्यारपत्र व साठेखत तयार करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितांविरोधात सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी आहे. आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रत्यक्ष प्रयत्न केल्याने सातारा शहर पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. प्रवेशद्वारासमोर पेट्रोलसदृश पदार्थ ओतला वालुथ, ता. जावली येथील बबनराव सखाराम गोळे आणि कुंदा बबन गोळे यांनीही आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर आंदोलन केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी सोबत आणलेला पेट्रोलसदृश पदार्थ अंगावर ओतून घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. उपोषणादरम्यान प्रकृती खालावली माण तालुक्यातील पळसावडे येथील नानासो यादव यांनी सामाईक कब्जे-वहिवाटीतील विहिरीच्या जागेत परवानगीशिवाय प्रवेश करून विहीर पूर्णपणे बुजवून नुकसान केल्याचा आरोप केला. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य विभागातील तक्रारीच्या चौकशीसाठी धरणे दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे सातारा जिल्हाध्यक्ष तथा कामगार युनियनचे रामभाऊ मदाळे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक अरुण गुरव यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. एकाच दिवशी विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मोठा बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
Source link
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनांचा धडाका:आत्मदहनाच्या प्रयत्नांनी प्रशासनाची तारांबळ