Headlines

अमरावतीत मोकाट गुरांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त:मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका वाढला




अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्ते, गजबजलेले चौक आणि अंतर्गत मार्गांवर गुरे थांबत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अमरावती-बडनेरा रस्त्यावरील काही चौकांसह राजापेठ, पंचवटी चौक, इर्विन चौक, गाडगे नगर आणि बसस्थानक परिसर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गुरांचे कळप रस्त्याच्या मधोमध उभे असतात. यामुळे वाहतूक मंदावते आणि वाहनधारकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसलेल्या भागात रस्त्यावर बसलेली गुरे सहज दिसत नाहीत, ज्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. यात अनेक नागरिक जखमी झाले असून, काही घटनांमध्ये प्राणहानी देखील झाली आहे. रस्त्यावरील मोकाट गुरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, गुरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करावी, तसेच शहरात विशेष मोहीम राबवून सर्व गुरे कोंडवाड्यात हलवावीत, अशी मागणी अमरावतीकरांकडून केली जात आहे. गर्दीच्या वेळी रस्त्यावर गुरांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दुकानांसमोर गुरे उभी राहत असल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही अडथळा निर्माण होतो. अनेकदा गुरे आपापसात भिडतात, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होतो. पशुपालक आपली गुरे मोकळी सोडून देतात. ही गुरे दिवसभर रस्त्यावरील कचरा आणि प्लास्टिक खाताना दिसतात. महापालिकेचे ‘कोंडवाडा पथक’ केवळ कागदावरच सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोकाट गुरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *